कागुद , शाही आनं बोटं
म्या शाईत बॉट बुडवुन कागदावर सागंतील तिथ ठसा ऊमटवला तर मला ५००० रुपये देणार व्हतत . घरी जाऊन बायकुला आनंदाची बातमी सांगायची म्हणुन घाईघाईत घरी आलु. म्हटलं यावेळी तरी तिला नविन साडी घेऊन देऊया. दरवाजा ठोठावला तर बायकु समोर. लग्नाआधी जशी मादक दिसायची तशीच. थोडायेळ मेव्हणी अशी अचानक ईथे कशी असा आंनदी परश्न पडला. पण मी कशी दिसते वो सांगा ना, सागां सागां ना आसं पाणी न ईचारता तगादा लावल्यावर कळलं ही तीच जी आधी हवी अन आतापण हवीच हाय. मग म्या म्हटलं अगं ऐकलस का ? शाईत बॉट बुडवुन कागदावर सागंतील तिथ ठसा ऊमटवला तर मला ५००० रुपये देणार म्हणं. यावेळी तुला नक्की साडी घेईन हं. ती म्हणाली माहीतेय. मला तर शाई कसली ह्ये दावण्याआधीच साडी दिलीये त्येनीं. ती पण खास पैठणी मेड ईन शिकागो.
ह्येच्या आयचा गो हयेच्या.
मला ठसा ऊमटवल्यावर देणार आन तुला आधीच. तवा बायको म्हणाली आव ते एक साडी देत व्हते. मी म्हटलं एकुण दहा बोटं हायती. सगळया बोंटास्नी ठसं द्यायला लावीन ती माझ्या शब्दाबाहेर नाह्यती. तुम्ही साडया किती देणार बोला.
म्या बायकुच ईथ घोडयापेक्षा फास्ट डोस्क चाललेल बघुन चाटच पडलो. कुतुहलाने म्हणालो पुढ सांग काय झालं
तवा ती अगदी तो-यात म्हणाली ८ साडया टाकुन गेल्याती.
म्या म्हणालु वा गं माझ्या हरणे.
मग म्हणाली बसा जेवाया. जेवाया बसल्यावर ती त्यानीच दिलेल्या साडीच्या पदरानं वारा घालत व्हती. रोजच्यापेक्षा वारा जरा जास्तच थंडच लागत व्हता.
रात्री झोपताना बायकुला म्हटलं आपल्याला किमंत न्हायी पण बोटाला लय किंमत हाय नाय गं. तर म्हणाली हो तर. म्हणाली ऊदया शाहीत बॉट बुडवुन कागदावर ठसा ऊमटवेपातुर जपुन ठेवा. मग आम्ही दोघं झोपलो. झोप लागणार तेवढयात दारा ठोठावण्याचा आवाज आला बायको म्हणाली कोण आसल वो एवढया रातच. दरवाज्या ऊघडला तर गावची मंडळी. हातात १०००० रुपयं आन १० पैठणी साडया वर ५ ब्लाऊजपीस देऊन म्हणाली ईथच ठसा दयायचा बर का. येतु.
बायकु आन मी माना हलवता येतील तितकया हलवल्या. दोघ बी खुश. रात्री दरवाजा न लावताच आम्ही झोपलो. रातभर दरवाजा वाजत व्हता.
दुस-यादिशी आम्ही बी रांगत. बोट खिशात शाबुत ठेवुन. तेवढयात दुर झाडापाशी बघितलं तर चदयां व्हता. त्यो बी " ऊभा " व्हता. ह्येनं कायच नाय दिलं. मग म्या आन माझी बायको रागानं तॉडं फिरवुन गेलो शाहीत बोट बुडवलं आणि ठसा दिला.
घरी आल्यावर दोघंबी खुश व्हतु. एकुण १५००० रुपय आणि १८ साडया ५ ब्लाऊजपीस मिळाल व्हंत. त्या रात्री बी आम्ही जागच आता कोणतरी येईल दरवाजा ठोठाविल. पण गेली ५ वर्ष दरवाजा वाजलाच नाही. माझी बायकु आन म्याच दरवाजा वाजवतोय मध्यरात्री. पण दरवाजा कुणीच ऊघडत नाहीये.
म्या खुप वराडलो बाहेरनच. आव संपलं वो १५००० रुपय. खायला काय बी नाह्या . कामधंदा बी मिळना झालय कुठं. बायकुच ब्लाऊज बी फाटलया वो. साडीच ठिगळं लावुन लावुन साडयापण फाटल्या तुम्ही दिलेल्या. मेड ईन शिकागो नग. साधी शेलमधली दया पण दया. ती नागवी होत चाललीया...आहो आम्ही दार ठोठावतुया ऊघडा तरी निदान. बॉटच कशाला हातच घेऊन जा तुम्हीच शाईत बुडवा आणि तुम्हीच ठसा दया कुठल्या कागुदावर कुठ द्यायचाय तिथं. भाकरतुकडा कामधंदा नगं व. मरेपर्यंत अगं झाकायला कापड दया बास.
तवढयात बायको म्हणाली आव काय झालं ऊठा. वाईट सपान पडल्याल का ? थांबा पाणी आणते. तीन पाणी आणलं म्या घटाघट प्यायलु. तॉंडावर मारलं. बायकोकडं डोळ वटारुन बघितल तर ती मी दिलेल्या जुन्या साडी ब्लाऊजमधेच व्हती. याकही ठिगळ नव्हतं कुठच. तव्हापासुन मी दारावर पाटीच लावलीया.
" हि बॉटं आमच ऐकत नाह्यती. ती शाईत बुडाली की आधंळी व्हत्यात. किरपया दरवाजा ठोठावु नये." ........
-विजय बिळुर.
रत्नागिरी
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment